मुंबई : मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला महाठग मोहनप्रसाद श्रीवास्तव याने यापूर्वी बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता हडपण्याचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे अशाच एका गंभीर गुन्ह्यात श्रीवास्तव याला आर्थिक गुन्हे विभागाने अटकही केली होती.सुजीत मंडळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील एक भूखंड त्यांचे वडील अभय मंडळ यांनी १९९0 साली एफ. ई. दिनशा ट्रस्टकडून खरेदी केला होता. त्या खरेदी खताची अभय मंडळ यांनी उपनिबंधकांकडे नोंदणीही केली होती. त्यानुसार जागेच्या सात-बारा उताऱ्यावर अभय मंडळ यांचे नाव आहे. नोव्हेंबर २00४मध्ये अभय मंडळ यांचे निधन झाले. त्यानंतर श्रीवास्तव याने मंडळ कुटुंबीयांशी संपर्क साधून तो भूखंड आपल्या श्री इंटरप्रायझेस या कंपनीने १९९९ साली अभय मंडळ यांच्याकडून खरेदी केला असून, त्या व्यवहाराची उपनिबंधकांकडे नोंदणी केल्याची माहिती दिली.मात्र मंडळ कुटुंबीयांनी तपासणी केली असता श्रीवास्तव याने दाखवलेल्या खरेदी खतावरील अभय मंडळ यांची सही बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून श्रीवास्तव आणि वडाळा येथील इक्बाल कासकर यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे विभागात गुन्हा दाखल करून दोघांना अटकही करण्यात आली होती. पुराव्यादाखल अभय मंडळ यांनी १९८१ साली उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रावरील त्यांची अस्सल सही सादर करण्यात आली असता आरोपींनी मंडळ कुटुंबीयांची जमीन हडपण्यासाठी खरेदी खतावर बनावट सह्या केल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांचे सातशे ते एक हजार कोटी रुपये घेऊन पोबारा करणारे मोहनप्रसाद, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, मुलगी अर्चिता, सून प्रीती या श्रीवास्तव कुटुंबीय तसेच धर्मेंद्र निकुंभ यांनी केवळ हाच नव्हे, तर असे अनेक गुन्हे केल्याचे दिसत असल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी; तसेच या प्रकरणाची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंंत्र्यांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)।मुंबईतून फरार झालेले आरोपी श्रीवास्तव व त्याचे कुटुंबीय उत्तर भारतात लपले असून, तेथे त्यांनी मुंबईतील गुंतवणूकदारांकडून लुबाडलेली रक्कम बांधकाम प्रकल्पात गुंतवल्याने ते प्रकल्प बंद करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे.
जमीन हडपण्याच्या गुन्ह्यातही महाठगाचा सहभाग
By admin | Published: October 03, 2016 5:24 AM