विधानसभा निवडणूक सुरु होताच राजकीय नेत्यांच्या मुलाखती, एकमेकांविरोधात वक्तव्ये सुरु झाली आहेत. २०१४ ला मोदींना पाठिंबा, नंतरच्या निवडणुकीत मोदींविरोधात भूमिका, त्यानंतरच्या निवडणुकीत मोदींनाच बिनशर्त पाठिंबा अशा बदलणाऱ्या भूमिकांवरून राज ठाकरेंना एका मुलाखतीत नुकताच प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रामदास आठवलेंसारखा मंत्री बनण्यापेक्षा मी पक्षच संपवून टाकेन असे वक्तव्य राज यांनी केले होते. यावर आता आठवलेंची प्रतिक्रिया आली आहे.
आठवले यांनी म्हटले की मी ज्या ज्या पक्षाला समर्थन दिले तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता आली आहे. अमित ठाकरेंची माहिमधून उमेदवारी लढण्याची एकमात्र योग्यता आहे ती म्हणजे ते राज ठाकरेंचे पूत्र आहेत, असे आठवले म्हणाले.
आता आठवले यांनी पुन्हा राज ठाकरेंना प्रत्यूत्तर दिले आहे. राज ठाकरेंना वक्तव्ये करण्याचा अधिकार आहे. परंतू ज्या प्रकारे त्यांनी माझ्याविरोधात वक्तव्य केले आहे ते ठीक नाही. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मनसेची महाराष्ट्रावर चांगली पकड बसविली आहे. परंतू त्यांना जागा जिंकण्यात यश मिळालेले नाही, असे आठवले यांनी सांगितले.
तसेच मी जेव्हा काँग्रेसला साथ दिली तेव्हा मंत्रिपद मिळाले. जेव्हा मी भाजप-शिवसेनेसोबत आल्यावर तेव्हाही सत्ता मिळाली. माझी ताकद भलेही छोटी असेल परंतू कोणाला निवडायचे आणि समर्थन द्यायचे याची ताकद मी ठेवतो, असे आठवले म्हणाले. राज ठाकरेंनी असे वक्तव्य करणे ठीक नव्हते. त्यांनी केले तरी मी नाराज नाही. माझी आई शेतात काम करायची. मी शिक्षणासाठी मुंबईला आलो. झोपडीतील लोकांना पक्के घर मिळावे, रोजगार मिळावा या अनेक मुद्द्यांवर मी संघर्ष केला आहे. यामुळे मी राज यांचे वक्तव्य गंभीरतेने घेत नाही, असे आठवले म्हणाले.