"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:57 IST2025-03-26T15:57:22+5:302025-03-26T15:57:53+5:30
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली असून यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीतील किस्सा सभागृहात सांगितला.

"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर प्रत्येकाने अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनावर भाषण केले. त्यात जयंत पाटील यांनी अण्णा बनसोडे यांना विधानसभेचं तिकिट कसं मिळालं यावरून खुलासा केला. त्यात जयंत पाटील यांनी अजितदादांनाही कोपरखळी मारली तेव्हा सभागृहात हशा पिकला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, तिकिट ठरवताना कुणी काय ठरवलं हे बाहेर सांगायचे नसते असा रितीरिवाज आहे. कुणाला तिकिट देताना मी का दिले हे कुणालाही सांगितले नाही कारण पक्षात एकोपा राहावा, एकसंघ राहून त्यावर पक्षाला निकाल मिळावा असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु दादांनी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडे गेल्यावर अण्णा बनसोडे यांना तिकिट कसे मिळाले हे सांगितले. परंतु वस्तूस्थिती वेगळी आहे असं त्यांनी म्हटलं.
अजितदादा आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव ठरवलं होते. त्यानंतर अजित पवार पुण्याला गेले तेव्हा तिथे काही लोकांनी टोल नाक्यावरच दादांना घेराव घातला. त्या लोकांनी मतदारसंघातील उमेदवारी बदला आणि अण्णांना तिकिट द्या अशी मागणी केली. मग दादांनी मला फोन केला, जयंतराव काय करायचे. त्यावर तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या असं सांगितले. दादांनी एबी फॉर्म मागितला, तो आधीच पुण्यात दिल्याचे मी सांगितले. तो एबी फॉर्म अण्णा बनसोडे यांना देण्यात आला आणि ज्यांना तिकिट दिले होते त्यांना मी फोन करून तुम्ही अर्ज भरू नका असं सांगितल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
अजित पवार काय म्हणाले होते?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाने अण्णा बनसोडेंना उमेदवारी नाकारली. मी गप्प बसलो, मी जयंतरावांना म्हटलं अण्णाचं तिकिट का कापलं, त्यांना उमेदवारी द्या त्यावर सगळेच काही माझ्या संमतीने होत नाही असं उत्तर त्यांनी दिले. माझा जिल्हा मोठा असल्याने मला एबी फॉर्म जास्त दिले होते. मी रात्री १२ ला मुंबईतून निघालो, अण्णांना जिथे एक्सप्रेस हायवे संपतो तिथे २ वाजता बोलावले. त्यांना एबी फॉर्म देऊन सकाळी ११ वाजता भरायला सांगितले. मी जयंतरावांना फोन करून जरा वेगळे केलंय फक्त तुम्ही संमती द्या, त्यावर काय केले असेल ते करा, पण माझं नाव सांगू नका असं जयंतराव म्हणाले. त्या निवडणुकीत १७ हजार मतांनी अण्णा निवडून आले असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात सांगितले.