३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 04:23 PM2023-04-17T16:23:03+5:302023-04-17T16:23:36+5:30
कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते असं बावनकुळे म्हणाले.
दिल्ली - भाजपाच्या प्रत्येक बूथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम घेतोय. ३० एप्रिलच्या मन की बातपर्यंत राज्यातील २५ लाखाच्यावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा आहे. बूथ सशक्तीकरण अभियनाचा आहे. सर्व बूथवर आमचा प्रवास सुरू आहे असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. पत्रकारांनी अजित पवार भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न बावनकुळेंना विचारला होता.
चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांना बावनकुळे म्हणाले की, १ लाख बूथवर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातील ७०० पदाधिकारी बूथवर जात आहेत. आम्ही २५ लाख बूथ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करणार आहे. मोठ्या पक्षप्रवेशाबाबत मी बोलणार नाही. परंतु पक्षात कोणीही आले तरी त्यांना स्थान आहे. भाजपाची विचारधारा ज्यांना मान्य आहे त्यांनी पक्षात प्रवेश केला तर त्याला कुणाची हरकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच भाजपात विचारधारेचा मुद्दा आहे. आमचे पहिले कर्तव्य देशासाठी तडजोड नाही. देव, देश, धर्म, संस्कृती यासाठी आम्ही काम करतो. कालपर्यंत कोणी कोणत्या विचारधारेवर काम करत असेल तर ते माहिती नाही. परंतु आमच्या पक्षात आल्यानंतर विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षात कुणी आले तरी विचारधारेशी सहमत झाला तर आमची कुणाची हरकत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दिल्ली दौरा प्रशासकीय कामासाठी
मी प्रशासकीय कामासाठी दिल्ली दौऱ्यावर आलोय, तर आशिष शेलार मुंबई-दिल्ली-बंगळुरू असा प्रवास करतायेत. त्यामुळे राजकीय दौरा नाही. अमित शाह यांना भेटायला गेलो तर राजकीय कारण असायला हवे असं नाही. दिल्लीत असल्यावर अमित शाह यांना भेटायला फोन केला ते म्हणाले या तर भेटायला जातो. आज राजकीय बैठक नाही असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
अजित पवारांबद्दल माहिती नाही
अजित पवारांबद्दल मला काही माहिती नाही. अजितदादांच्या भूमिकेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राजकारणात चर्चा खूप होतात, पण जर-तर याला अर्थ नसतो. अजित पवारांनी भाषण का दिले नाही हे मविआने ठरवावे असंही बावनकुळे म्हणाले.