येत्या ८ दिवसांत पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या; बारामतीत अजित पवारांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:12 PM2024-08-05T21:12:45+5:302024-08-05T21:13:33+5:30
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
बारामती - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवशीय बारामती दाैऱ्यावर आले आहेत. लोकसभा निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्शन मोडमध्ये येत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी(दि ५) बारामती येथे दिले.
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर पवार यांनी बारामतीत महत्वाच्या विकासकामांमध्ये लक्ष घालत कार्यकर्ते यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहर, तालुक्यात आता खांदेपालट होण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार बारामतीत पक्ष पातळीवर पक्षनिष्ट आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. ५) बारामतीत आयोजित मेळाव्यात पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले.
पवार हे रविवारपासून बारामती दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा बोरकरवाडी येथे जाहीर कार्यक्रम झाला. त्यानंतर ते बाबुर्डी येथे गेले. जिरायती दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत अनेकांनी पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी सोमवारी तात्काळ निर्णय घेतला. पवार म्हणाले,म्हणाले, आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम करायचा असे चालले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, दादा तुमचा म्हणवला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. हे चालणार नाही. अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, पाहायला मिळाल्या आहेत. इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे, आपण प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या बुथवर जिथे मतदारयादीत नाव आहे, तेथे तरी घड्याळाला मताधिक्य मिळाले का असा सवाल त्यांनी केला. तसेच १५ ऑगस्टपूर्वी नवीन निवडी केल्या जातील असे त्यांनी सांगितले.