लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नागरिकांचे काम असेल, तर ‘आम्ही सत्तेत नाही, सत्ताधारी पक्ष वेगळा आहे’, तुम्ही त्यांना संधी दिली आता घ्या अनुभव असे सांगून जनतेच्या प्रश्नावर वेळकाढू भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाच्या अनेक पदाधिकारी, आणि नगरसेवकांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. त्यांची वैयक्तिक कामे, व्यावसायिक स्तरावरील कामे अडचणीत आल्याचे निदर्शनास येत नाही. त्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले, तरी धंदे, व्यवसाय एकच आहेत. हे वास्तव पिंपरी-चिंचवडमध्ये पहावयास मिळते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेले. भाजपातील त्यांचा प्रवेश हा केवळ राजकीय अभिलाषेपोटी झालेला नाही, तर त्यांच्या अवैध व्यवसायाला सत्ताबदलाचा फटका बसू नये, हा त्यामागील मूळ उद्देश आहे. सत्ता बदलल्यानंतर व्यावसायिक स्तरावर होणारा त्रास टाळण्यासाठी आणि व्यवसायाला संरक्षण मिळावे, यासाठी काहींनी भाजपाशी घरोबा केला आहे. एवढेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी एकाच पक्षात असताना कोणी हॉटेल, तर कोणी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली. निवडणूक काळात त्यांचे राजकीय पक्ष बदलले. राजकीय व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधक असे त्यांचे संबंध असले, तरी इतर वेळी ते व्यावसायिक म्हणून एकमेकाला साथ देतात. त्यामुळे विरोधी पक्षात काम करणारे पदाधिकारी महापालिकेत आक्रमक पद्धतीने विरोधाची भूिमका मांडताना दिसून येत नाहीत. धंदा, व्यवसायात त्यांचे साटेलोटे असल्याने त्यांच्या कोणत्याच कामात अडचण येत नाही. त्यांना नागरिकांची कामे करण्यासाठी मात्र अडचण येते. विरोधी पक्षाकडून आक्रमकता नाहीराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी यांचे भागीदारीत व्यवसाय आहेत. कोणाची बांधकाम व्यवसायात, तर कोणाची हॉटेल, बार अशा व्यवसायात भागीदारी आहे. परिणामी महापालिकेत विरोधी पक्षात काम करणाऱ्यांची आक्रमकता दिसून येत नाही. सत्तेशिवायही होताहेत कामेनागरिकांनी त्यांची सार्वजनिक स्वरूपाची कामे सांगितल्यास सत्तेत नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात, असे सांगून अनेकदा तगाद्यातून ते सोडवणूक करून घेतात. त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करण्यासाठी पक्षाची सत्ता येऊ द्या, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. नागरिकांची कामे करायची तर सत्ताच असली पाहिजे ही सबब नागरिकांचे समाधान करणारी नाही. सत्ताधारी वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक असले, तरी त्यांची कामे होत असतील, तर नागरिकांचीही कामे होणे अपेक्षित आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पक्ष वेगळे; भागीदारी एकत्रच
By admin | Published: July 10, 2017 1:55 AM