पुणे : गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पाहत नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला ते सांगावे असा सवाल भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी केला. तुमच्या मनातील मंत्री मीच असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.सुधाकरराव जाधवर संस्थेतर्फे आयोजित युवा संसदेमध्ये ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना पुरस्कार देण्यात आला. आमदार विनायक मेटे, डॉ.नीलम गो-हे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव जाधवर आदी उपस्थित होते.एकनाथ खडसे म्हणाले, गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे. कोणाकडे पाहून राजकारणात येण्याची आता हमी देता येत नाही. राजकारण्यांपेक्षा उत्कृष्ट अभिनेते व कलाकार कोणीही नाही. वरुन आणि आतून वेगवेगळे चेहरे पाहायला मिळतात. विनायक मेटे म्हणाले, गरीबी हटाओ, बेकारी हटाओ अशी अनेक आश्वासने दिली गेली. त्यामुळे आश्वासन न पाळण्यासाठी दिले जाते, असे राजकारण्यांबाबत लोकांमध्ये मत झाले आहे. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.
मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे : एकनाथ खडसे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:18 PM
गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले.
ठळक मुद्देडॉ.सुधाकरराव जाधवर संस्थेतर्फे युवा संसद आयोजन