राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेल्या राजीनामा देण्याच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर २ मे रोजी झालेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय़ जाहीर केला होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव निवड समितीच्या बैठकीत मांडला. त्यानंतर शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार काय अंतिम निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.