अलिबाग : गणेशोत्सवासाठी गेल्या दोन दिवसांत तब्बल दोन हजार पाच एसटी बसेस, सुमारे तीन हजार खासगी बसेस आणि ३० ते ३५ हजार अन्य खासगी वाहनांतून सुमारे सहा लाख गणेशभक्त कोकणात दाखल झाले. रायगड पोलिसांच्या नियोजनशून्यतेचा फटका त्यांना बसला. १ लाख २५० गणेशभक्त २००५ विशेष एसटी बसेसमधून कोकणात रवाना झाल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रायगड (पेण) विभागीय कार्यालयाचे वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. एसटी प्रवासास किमान सहा तासांचा विलंब होत होता. मिनीबस कोसळून एक ठारसुकेळी खिंडीतून मंगळवारी रात्री नागोठणेकडे येताना ओव्हरटेकच्या नादात मिनीबस नाल्यात कोसळली. त्यात चालकचा मृत्यू झाला. मिनीबस चालक व मालक बाबासो धोंडीबा खरात (३१,अंधेरी) हे चिपळूणला प्रवासी सोडून परत मुंबईला येत असताना अपघात घडला. अपघातग्रस्त वाहनाजवळ कोणीही आढळले नाही. चालकाचा शोध घेतल्यानंतर पहाटे मृतदेह सापडला. एसटीची कारला धडक -दिघी-पुणे मार्गावर सुतारवाडीनजीक एसटी बस आणि स्विफ्ट कारच्या अपघातात चौघे जखमी झाले. हे सर्व ठाणे येथील रहिवासी आहेत. -अमेय मोरे (२३), स्नेहा मोरे (४५), संगीता मोरे (४८) आणि विकास मोरे (५२) अशी त्यांची नावे आहे. यातील विकास व स्नेहा मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेल येथे हलविण्यात आले. एसटीचा चालक सुरेश ठोंबरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले .
कोकणात जाणाऱ्यांना सहा तासांचा विलंब
By admin | Published: September 17, 2015 1:29 AM