पुणे: कोरोना टाळेबंदीत प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्या वाहनांचा कर माफ करावा असा प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला दिला आहे. तो मंजूर झाला तर राज्यातील २८ लाख प्रवासी वाहनांंना याचा फायदा होईल.राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाने कर माफ करण्याची मागणी केली होती. वातानुकूलित ऑल इंडिया परवाना असलेल्या वाहनाला वार्षिक दीड लाख तर साध्या प्रवासी रिक्षाला वर्षाला ८ हजार याप्रमाणे आरटीओकडून वाहन कर आकारला जातो. कोरोना टाळेबंदी काळात २३ मार्चपासून सर्व प्रवासी वाहतूक पुर्ण बंद आहे. पुन्हा कधी सुरू होईल याची निश्चिती नाही. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर दरम्यानचा कर माफ करावा अशी मागणी महासंघाने केली होती.त्यावर महासंघ व परिवहन आयुक्त अशी बैठक झाली. त्या बैठकीत कर माफी मिळाली नाही तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणून तिथेच लावण्याचा इशारा देण्यात आला होता.महासंघाचे पदाधिकारी बाबा शिंदे म्हणाले, या बैठकीनंतर परिवहन आयुक्तांंनी सरकारला तसा प्रस्ताव पाठवला आहे. साध्या रिक्षांपासून ते एसी वाहनांपर्यत सर्व प्रवासी वाहनांचा प्रस्तावात समावेश आहे. मंत्री मंडळासमोर तो आणला जाईल व त्याला निश्चित मंजुरी मिळेल. उत्पन्नच बंद असल्याने कोणत्याही मालकाला असा कर जमा करणे शक्य होणार नाही असे शिंदे म्हणाले.
राज्यातील प्रवासी वाहनांचा कर होणार माफ ? २८ लाख वाहनांना होऊ शकतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 6:37 PM
राज्यातील २८ लाख प्रवासी वाहनांंना याचा होणार फायदा
ठळक मुद्देपरिवहन आयुक्तांचा सरकारला प्रस्ताव