राम देशपांडे
अकोला, दि. 21 - रेल्वेने प्रवास करणार्या वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मदतीचा हात देण्यासाठी विभागातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांना सेवा-सुविधा प्रदान करण्यासाठी रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असते; मात्र अनेकदा रेल्वेने प्रवास करणार्या किंवा प्रवासाला निघालेल्या वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना अडचणींचा सामोरे जावे लागते. यथायोग्य सुविधा उपलब्ध असतानासुद्धा त्यांचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत. रेल्वे स्थानकांवर व्हिलचेअर्स, स्ट्रेचर्स, हमाल (कुली) इत्यादी सुविधा उपलब्ध असूनसुद्धा त्यांचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत.
अशा प्रसंगी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रवासी मित्र हा आशेचा किरण ठरू शकतो. नि:शुल्क सेवा देणार्या ह्यप्रवासी मित्राच्या मदतीने आजारी किंवा अपघातग्रस्त व्यक्तीस रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचू शकतात. प्रवाशांचे समाधान हा एकमेव उद्देश डोळय़ासमोर ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय माहिती अधिकारी आर. एस. पाटील यांनी सांगितले. ही संकल्पना यशस्वीरित्या राबविण्यासाठी रेल्वेच्या स्थानिक कर्मचार्याचा विचार केला जाणार असला तरी, सामाजिक संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्त्यांनासुद्धा त्यात सहभागी करून घेण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवासी मित्रम्हणून सेवा प्रदान करणार्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा संपर्क क्रमांक उद्घोषणेद्वारे व रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या अन्य माध्यमांद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.