मुंबई : मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना प्रतीक्षा असलेल्या एसी लोकलची कुर्ला कारशेडमध्ये गुरुवारपासून चाचणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी एसी लोकल चाचणीत पास झाली असून, आता आणखी काही चाचण्या दोन ते तीन आठवडे सुरू राहतील. कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलच्या १९ विविध चाचण्या दोन ते तीन आठवडे घेण्यात येतील. यामध्ये कारशेडमधील ८00 मीटर परिसरात ही लोकल चालवून चाचणी घेतली जाईल, तसेच वक्तशीरपणा दर्शविणारी चाचणी, लोकलच्या स्वयंचलित दरवाजाबरोबरच त्यातील एसीची (वातानुकूलन) व अन्य चाचण्यांचाही यात समावेश असेल. गुरुवारी कारशेडमध्ये या लोकलच्या अंतर्गत चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होतात का, वातानुकूलन व्यवस्था काम करते का, यासह अन्य चाचण्या घेण्यात आल्या. दिवसभरात जवळपास सहा तास चाचण्या घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ५४ कोटी रुपयांची असलेली एसी लोकल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाली. मात्र, लोकल दाखल झाल्यानंतर त्यातील सॉफ्टवेअर समस्यांबरोबरच त्याच्या उंचीचा मुद्दा समोर आला. यातील सॉफ्टवेअरच्या चाचणीची समस्या सोडवण्यात आल्यानंतर, लोकलच्या चाचणीला कारशेडमध्ये गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)
एसी लोकल पहिल्या दिवशी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 5:46 AM