गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:17 AM2022-07-24T05:17:27+5:302022-07-24T05:18:54+5:30

सभागृह आणि गोंधळ असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे काहीही करून लक्ष वेधायचे

Passing bills in confusion is betrayal of people: Rahul Narvekar | गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर

गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर

googlenewsNext

यदु जोशी

मुंबई : जनसामान्यांच्या हिताचे निर्णय विधानसभेत करतील म्हणून लोक विश्वासाने आमदारांना निवडून देतात, पण सभागृहात बरेचदा गोंधळातच विधेयके मंजूर होतात, हा जनतेचा विश्वासघातच आहे. माझ्या कारकिर्दीत एकही विधेयक गोंधळात मंजूर होणार नाही, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर प्रभुत्व, कायद्याचा सखोल अभ्यास आणि राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण असा संगम असलेले ॲड. नार्वेकर यांनी या मुलाखतीत संसदीय कामकाजाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि स्वत:चे व्हिजनदेखील सांगितले.

सभागृह आणि गोंधळ असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे काहीही करून लक्ष वेधायचे, त्यासाठी गोंधळ घालायचा ही परिस्थिती आपल्या कार्यकाळात बदलेल की तशीच राहील? ॲड. नार्वेकर - मी विश्वास देतो की, ही परिस्थिती नक्कीच बदलेल. सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर पुढे त्याचे कायद्यात रूपांतर होते. हे कायदेमंडळ आहे. गडबड, गोंधळात विधेयके मंजूर करवून घेण्यावर बरेचदा भर दिला जातो, मी तसे होऊ देणार नाही. एखादा कायदा करताना त्यावर सांगोपांग चर्चा झालीच पाहिजे, यावर भर असेल. सभागृहाची गौरवशाली प्रतिमा कुठेही डागाळणार नाही हे मला बघावेच लागेल. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने आमदारांचा सभागृहातील गोंधळ वाढला आहे असे नाही का वाटत? 

ॲड. नार्वेकर - पारदर्शकता ही लोकशाहीची गरज आहे. थेट प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे, आपले आमदार काय बोलतात, कसे वागतात, हे ते बघत असतात. अशावेळी असंसदीय वर्तणूक होणार नाही याची काळजी आमदारांनी घेतलीच पाहिजे. संसदीय लोकशाहीच्या चौकटीत राहूनच आमदारांनी बोलावे, वागावे हा माझा आग्रह असेल. त्यादृष्टीने एक शिस्त आवश्यक आहेच. विधानमंडळाच्या अधिकारात न्यायपालिकांचा हस्तक्षेप हा विषय सातत्याने चर्चिला जातो. न्यायपालिकांचा असा हस्तक्षेप वाढला आहे असे वाटते का? ॲड. नार्वेकर - मी ज्या पदावर आज आहे त्यावरून मला तसे म्हणता येणार नाही. कार्यकारी मंडळ, विधानमंडळ आणि कायदेमंडळ हे लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत आणि त्यांना समान स्थान आहे. त्यामुळे तिघांपैकी कोणीही दुसऱ्यावर  कुरघोडी करणे अपेक्षित नाही. तिन्हींनी आपापल्या मर्यादेत राहून काम करायला हवे.   दुसऱ्याची कार्यकक्षा ही आपल्या अधिकारात आहे, असे समजून वागणे हे संविधानाच्या तरतुदींच्या विपरीत आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना फक्त उजवा कान असतो, डावा कान नसतो म्हणजे डाव्या बाजूची (विरोधकांची) ते फारशी दखल घेत नाहीत, अशी तक्रार  विरोधकांकडून नेहमीच केली जाते, आपल्याला दोन्ही कान असतील का? 

ॲड. नार्वेकर - नक्कीच मला दोन्ही कान असतील आणि दोन्ही कानांनी मला सारखेच ऐकू येईल. सर्वांना समान संधी दिली जाईल. बरेचदा ज्येष्ठांना अधिक संधी मिळते. नवीन आमदारांना सभागृहात बोलण्याची समान किंवा पुरेशी संधी मिळेल याची मी ग्वाही देतो. अध्यक्ष कामकाजाचा नार्वेकर पॅटर्न काय असेल? ॲड. नार्वेकर - विधानसभेच्या उच्च परंपरा कायम राहतील याला माझे प्राधान्य राहील. दोन्ही बाजूंच्या संवादावर माझा भर असेल. कामकाज पेपरलेस करण्यावर माझा भर असेल. नागपूरच्या विधानभवनात वर्षभर काही गतिविधी चालव्यात. त्यासाठी देशभरातील लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणाचे ते केंद्र बनवता येईल, यादृष्टीने माझे प्रयत्न असतील.

वयाच्या ४५व्या वर्षी विधानसभा अध्यक्षपदाचा सन्मान मिळालेले ॲड. राहुल नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक तर आहेतच, शिवाय संसदीय कामकाज कसे चालावे, यासंबंधी त्यांची सुस्पष्ट मते आहेत. त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...

Web Title: Passing bills in confusion is betrayal of people: Rahul Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.