कोल्हापूर : ज्या नागरिकांचे दहा अथवा वीस वर्षांच्या कालावधीसाठीचे हस्ताक्षरातील पासपोर्ट आहेत. शिवाय त्यांनी ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नवीन स्वरूपात करून घेतलेले नाहीत, अशा पासपोर्टधारकांना आता परदेशात प्रवेश मिळणार नाही. याबाबतचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे.गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी वीस आणि दहा वर्षांच्या कालावधीसाठी पासपोर्ट देण्यात आले होते. हे पासपोर्ट हस्ताक्षरात लिहिलेले होते. मात्र, सुरक्षितता आणि अचूकतेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केलेले पासपोर्ट देणे सुरू केले. हस्ताक्षरातील ज्यांचे पासपोर्ट आहेत. त्यांनी ते नवीन करून घ्यावेत, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा पुरविणाऱ्या संस्था आणि विविध माध्यमांद्वारे दिल्या होत्या. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला परराष्ट्र मंत्रालयाने हस्ताक्षरातील पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना परदेशात प्रवेश द्यावयाचा नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे. याबाबतच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रतिनिधींना दिल्या आहेत. ज्यांचे पासपोर्ट हस्ताक्षरातील असतील त्यांना विमानतळावरूनच मागे फिरावे लागणार आहे. वर्षभरापूर्वी दिलेली सूचना बेदखल करून हस्ताक्षरातील पासपोर्ट घेऊन बसलेल्या लोकांना या निर्णयामुळे फटका बसणार आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के नवीन पासपोर्टपर्यटन तसेच विविध कामांनिमित्त परदेशवारी करणाऱ्यांचे कोल्हापुरातील प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. साधारणत: महिन्याला सहाशेजण पासपोर्ट काढतात. ते नवीन स्वरूपातील असल्याचे ‘ट्रेडविंग्ज’ कोल्हापूरचे व्यवस्थापक बी. व्ही. वराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवे पासपोर्ट हे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांना प्रवास बंदीचा परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेला निर्णय चांगला आहे. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांची देशातील संख्या सुमारे ६० हजारांपर्यत आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के पासपोर्ट नव्या स्वरूपातील आहेत. ज्यांना भविष्यात कोणत्याही परदेशात जायचे नाही, अशा व्यक्तींनी हस्ताक्षरातील पासपोर्ट बदलून घेण्याची तसदी घेतलेली नाही. अशा व्यक्तींचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. ज्यांनी व्हिसा काढला आहे आणि त्यांना २४ नोव्हेंबरनंतर प्रवास करायचा आहे. त्यांना आता प्रवासाचे नियोजन पुढे ढकलून नवीन पासपोर्ट काढण्याशिवाय पर्याय नाही. (प्रतिनिधी)बनावटगिरीला चापहस्ताक्षरातील पासपोर्टमध्ये बनावटगिरी करता येत होती. त्याला चाप बसविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवीन पासपोर्ट बनविण्यात आले आहेत. या नव्या पासपोर्टचे पहिल्यांदा स्क्रिनिंग केले जाते. त्यामुळे पासपोर्ट क्रमांक अथवा नाव हे विमानतळावरील संगणकीकृ त यंत्रणेवर प्रवेशित केल्यानंतर पासपोर्टधारकांची माहिती समजते. शिवाय जगातील कोणत्याही विमानतळावर पासपोर्ट पाहता येतो.
हस्ताक्षरातील पासपोर्ट ठरणार कालबाह्य
By admin | Published: November 20, 2015 12:33 AM