कडेगाव : कॉम्रेड गोविंदराव पानसरेंची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना आणि त्यामागील सूत्रधारांना शोधून कठोर शिक्षा दिली पाहिजे. कॉ. पानसरे पुरोगामी विचारांचे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचे कणखर नेतृत्व होते. त्यांचे विचार जोपासण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांवर हल्ला करणारी विकृत प्रवृत्ती शोधली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, मी मदत व पुनर्वसनमंत्री असताना टंचाई उपाययोजना निधीतून टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेची आवर्तने दिली होती. यासाठी निधीचीही तरतूद केली होती. आता नव्या सरकारने अद्याप निधी देण्यास विलंब केला आहे. संबंधित आयुक्तांनी ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे सांगितले आहे. आता हा निधी प्राप्त होईल. परंतु यापुढे टंचाई काळात अशी आवर्तने मिळतात का ते पाहा, असा टोलाही त्यांनी लगावला. डॉ. कदम म्हणाले, आता कडेगाव नगरपरिषद होणार आहे. शासनाचा निर्णय एकदा झाला की शक्यतो बदलत नाही. ५ मार्चपर्यंत हरकतींची मुदत असली तरी, हरकती घेऊन काही उपयोग होत नाही. कडेगाव नगरपरिषद होणार हे निश्चित आहे. (वार्ताहर)
कायदा व सुव्यवस्था ढासळली : डॉ. विश्वजित कदमप्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या हे सामाजिक व्यवस्थेला लागलेले गालबोट आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. अन्य व्यापातून गृहखात्यासाठी त्यांना वेळ देता येत नसेल, तर त्यांनी ते अन्य व्यक्तीकडे द्यावे. आगामी अधिवेशनात प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था आणि शासनाचा अनागोंदी कारभार याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.