पतंगराव कदम नावाचं वादळ शमलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:33 PM2018-03-09T22:33:55+5:302018-03-09T23:27:58+5:30
एका छोट्या कुटुंबातून पुढे आलेले हे राजकिय वादळाच होतं असं म्हणायलं हवं
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी 74 व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. एका छोट्या कुटुंबातून पुढे आलेले हे राजकिय वादळाच होतं असं म्हणायलं हवं.
कसा होता त्यांचा कार्यकाळ -
सांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील शेतक-याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंतच शाळा, पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एक शिक्षकी शाळेत काम केले. राजकीय, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मात्र, काहीतरी आगळंवेगळं करायचं असं त्यांच्या मनात पक्कं होतं. नावामागे डॉक्टरेट लागली. कुलपती पद लागले. आमदारपद आले. मंत्रिपद आले. ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची ऊर्मी बाळगली, त्यात यशस्वी होतच गेले. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारा एक छोटा कार्यकर्ता १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दोन-अडीचशे मतांनी पराभूत झाले. ही पहिलीच निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे.
पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावची कामं करणे कधी सोडले नाही. वास्तविक, पतंगराव कदम यांच्या राजकारणाची अधिक चर्चा होते; पण ते खरे शिक्षण प्रचारक-प्रसारक आहेत. सामान्य माणसांच्या घरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, यासाठी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचा प्रचंड विस्तार वाढत राहिला. सहकारातील त्यांच्या कामाची चर्चा कमी होते. त्यांनी बँक, सूत गिरण्या, साखर कारखाने स्थापन केले. या सर्व संस्था उत्तम चालविल्या आहेत. त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सांगलीत निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, मला सांगलीत भव्यदिव्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करायचे आहे. तो शब्द खरा करण्यासाठी केवळ एकच वर्ष लागले. २००५ मध्ये ६१ व्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी ५० एकरांवरील वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया खोदला. बारा वर्षांत त्या जागेवर शंभर कोटी रुपयांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर फुलला आहे. उत्तम सेवा, गरिबांना आधार देणाऱ्या योजना येथे सुरू आहेत.
आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचे उत्तम उदाहरण त्यांचा पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात दोन तालुके स्थापन केले. त्या तालुक्यांची सर्व कार्यालये पाच वर्षांत पूर्ण बांधून काढली. ताकारी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहून कृष्णेच्या पाण्याच्या शिंपणाने कडेगाव तालुक्याचे नंदनवनच झाले आहे. अशी असंख्य कामे करताना अगदी मोकळा स्वभाव आणि धाडसीपणा ही दोन्ही रूपे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सातत्याने दिसतात. गरिबांविषयी प्रचंड कणव व श्रीमंताविषयी आकस नाही; पण आपणाला जे मिळाले आहे ते इतरांना दिले पाहिजे, ते सर्वांना वाटले पाहिजे असे ते एकदा म्हणाले आणि तसेच वागत राहिले. त्यामुळेच एक सामान्य माणूस वादळासारखा सतत सार्वजनिक कामात गर्जत राहिला.