पाटस : पाटस (ता. दौंड) येथे बहुतांशी वीज ग्राहकांना अस्पष्ट विद्युत बिले मिळाली असल्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. बिल नेमके किती आहे, याचा अंदाज येत नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. पाटसला विद्युत वितरणाचे बिल ग्राहकांना वाटप करण्यात आली आहेत. या बिलांवर ग्राहक क्रमांक आणि ग्राहकांची नावे नाहीत. परिणामी काही ठिकाणी अस्पष्ट भरण्याची रक्कम नमूद करण्यात आली आहे. पाटस येथील एका पतसंस्थेत वीजबिल भरणा घेतला जातो. मात्र बिलच अस्पष्ट असल्याने बिलं कोणाच्या नावाने करायची हा प्रश्न पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांना ही वीजबिले स्वीकारता येईना. ग्राहकांनी वेळेत बिले भरली नाही, तर नाहक दंडाचा भुर्दंडदेखील सोसावा लागेल. तेव्हा पाटस येथील काही ग्राहकांनी दौंडच्या विद्युत मंडळात येऊन यासंदर्भात तक्रार केली. मात्र तेथील अधिकारी म्हणाले की, ही विजबिले बारामती येथून येतात तेव्हा यासंदर्भात योग्य ती चौकशी करण्यात येईल. (वार्ताहर)
पाटसला अस्पष्ट वीजबिले
By admin | Published: January 13, 2017 2:15 AM