मुंबई - मराठा समालाजाचा एसइबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर इतर जातीय समुहांच्याही आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या धनगरांच्या आरक्षणाच्या आशाही उंचावल्या आहेत. मात्र धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचे समोर आले आहे. धनगरांना आरक्षण देण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल नकारात्मक आल्याने धनगरांना आरक्षण मिळण्याचा मार्ग बिकट झाला आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक आल्याने राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग अवघड झाला आहे. बॉम्बे रजिस्ट्रेशन अॅक्टमध्ये धनगरऐवजी धनगड असा उल्लेख झाला असल्याने धनगरांना आरक्षण मिळत नसल्याचा आक्षेप घेतला जात होता. मात्र धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असून, धनगड ही वेगळी जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. धनगड हेच खरे आदिवासी आहेत. त्यामुळे धनगडांच्या आरक्षणासाठी धनगर पात्र नाहीत, असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात असलेल्या धनगर समाजातील पोटजातींच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये धनगरांपैकी काही जाती मागास असल्याचे समोर आले आहे. मात्र काही जातींकडे नोकरी, घर, जमीन असल्याचे समोर आले आहे.
धनगर आरक्षणाचा मार्ग खडतर, आरक्षणाबाबतचा अहवाल नकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:00 PM