मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाकडून तब्बल ३७८१ जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत. तसेच आषाढी एकादशीनंतरही घरी परतणाºया भाविकांची परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी १० टक्के एसटी बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच आषाढी एकादशीदरम्यान ३ विशेष बसस्थानकेही प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येणार आहेत.अवघ्या महाराष्ट्राला आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. या आषाढी एकादशीनिमित्त विठू माउलीच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने एसटी महामंडळही तयारीला लागले आहे. त्यानुसार २१ ते २८ जुलै या आषाढी एकादशीच्या आठवड्यात पंढरपूरला जाणाºया वारकºयांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी एसटीचे ८ हजार कर्मचारी अहोरात्र काम करणार आहेत. नुकतीच याबाबत मुंबईत परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल, एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांचे प्रमुख वाहतूक नियंत्रक उपस्थित होते.यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूरमध्ये या काळात ३ विशेष एसटी स्थानके उभारण्यात येणार आहेत.मराठवाडामधून येणाºया प्रवाशांसाठी भिमा बस स्थानक, मुंबई आणि पुण्यामधून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी चंद्रभागानगर बसस्थानक आणि जळगाव-नाशिक भागातून येणाºया-जाणाºया प्रवाशांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखाना इथे तिसरे विशेष स्थानक उभारण्यात येणार आहे.
एसटीची पावले धावती ‘पंढरी’ची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 5:59 AM