हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:05 PM2019-09-04T12:05:32+5:302019-09-04T12:23:49+5:30
आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटलांनी विजयसिंह मोहिते-पाटील याचा घेतला निरोप
अकलुज : माजी सहकार राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर असुन आज इंदापुरातील कार्यकर्त्याच्या मेळाव्यापुर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांची शिवरत्न बंगल्यावर भेट घेवुन गुप्त चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मोठा राजकीय हादरा बसत आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. आज बुधवार ४ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी त्यांनी इंदापुर येथे बैठक बोलावली आहे. तत्पुर्वी अकलूज येथे येऊन माजी खा. विजयदादा यांची भेट घेतली. उभय नेत्यांची बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.
भेटीनंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे कॉग्रेस राष्ट्रवादीला मोठे राजकीय धक्के मिळत असुन आता पुणे जिल्ह्यातील राजकीय वजनदार असणारे हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपात आणण्यासाठी विजयसिंह मोहिते - पाटलांची राजकीय खेळी यशस्वी ठरत आहे.
-----------
राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांना कंटाळलो...
राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची आघाडी आहे, परंतु राष्ट्रवादीकडुन सतत कुरघोडीचे राजकारण केले जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला इंदापुर तालुक्यातुन मताधिक्य मिळवुन देवुनही राष्ट्रवादीचे कुरघोडीचे राजकारण सुरुच असुन त्याला कंटाळून राजकीय निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे, तत्पुर्वी विजयदादांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़