लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: जीएसटी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाषणाच्या ओघात भाजपाच्या महिला आमदारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर रविवारी सभागृहात आली.विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे, स्रेहलता कोल्हे आणि भारती लव्हेकर यांच्याविषयी काही विधान केले होते. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच लव्हेकर यांनी या विषयी निषेध नोंदविला.मंदा म्हात्रे म्हणाल्या की, जयंत पाटील हे सुसंस्कृत आमदार आहेत. त्यांनी असे वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी होती, पाटील यांनी मला फोन करुन काल खेद व्यक्त केला; मात्र त्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, ज्या जयंत पाटील यांनी मंत्री असताना महिला आरक्षण विधेयक पास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्याकडून महिलांचा अनादर करणारे कोणतेही वक्तव्य झाले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र यावर गोंधळ वाढल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कामकाज संपताना जयंत पाटील यांचे वक्तव्य रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. गिरीश बापट यांनीही दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. तेव्हा जयंत पाटील यांनी, आपल्याला कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. महिला आमदार आपल्याला बहिणीसमान असून त्यांचा अपमान झाल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत वादावर पडदा टाकला.
पाटील यांची दिलगिरी
By admin | Published: May 22, 2017 12:38 AM