लोकसभेतील पराभव बाजूला सारत पटोले, शेट्टी, खैरेंना विधानसभेचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 10:55 AM2019-08-07T10:55:28+5:302019-08-07T10:56:37+5:30
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसनेते नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत.
मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यामध्ये सर्वाधिक विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश असला तरी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या पदरीही पराभव आला आहे. राजकारणात पदाशिवाय प्रश्न सुटत नाहीत, किंबहुना पदाशिवाय राहणे कठीण असल्यामुळे पराभूत नेत्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणकाँग्रेसनेतेनाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. तशी तयारीही या नेत्यांनी सुरू केली आहे. या दिग्गज नेत्यांव्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लोकसभेत स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणारे नेते पुढील काळात विधीमंडळात दिसण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नव्हतेच. परंतु, पक्षादेशामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच भाजपमध्ये बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांना नागपूरमधून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. परंतु, नाना पटोले यांनी लोकसभेचा पराभव बाजुला सारून आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. किंबहुना काँग्रेसने देखील त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु, ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार हे अद्याप निश्चित नाही.
पटोले यांच्यापाठोपाठ राजू शेट्टी देखील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांचा बुलंद आवाज लोकसभेत नसला तरी विधानसभेत घुमणार हे नक्की. ते शिरोळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
खैरेंचा पराभव सेनेच्या जिव्हारी
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीत शिवसेनेने राज्यातील आपली पत कायम राखली. परंतु, औरंगाबाद मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक करणारे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांना विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने खैरे यांनी देखील तयारी सुरू केली आहे.