कल्याण : परिवहन आणि शिक्षण समिती सभापतीपदी अनुक्रमे शिवसेनेचे संजय पावशे आणि वैजयंती गुजर-घोलप यांच्या बिनविरोध निवडीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. केडीएमसीत परिवहनच्या सभापतीपदासाठी दुपारी ३.३०, तर शिक्षण समिती सभापतीपदासाठी दुपारी ४ वाजता निवडणूक झाली. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. या दोन्ही सभापतीपदांसाठी दोघांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. माघार घेण्याच्या प्रक्रियेत उमेदवारी मागे न घेतली गेल्याने पावशे आणि घोलप यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा कल्याणकर यांनी केली. मागील शिक्षण समितीचे सभापतीपद घोलप यांना मिळणार होते. परंतु, ते भाजपाच्या वाट्याला गेल्याने त्यांची संधी हुकली होती. अखेर, बुधवारी त्यांचे स्वप्न साकार झाले. एक अभ्यासू आणि आक्रमक चेहरा, अशी ओळख असलेल्या घोलप या स्वत: शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे महापालिकेचा शिक्षण विभागाचा कारभार त्या आता कसा चालवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील समितीतदेखील त्या सदस्या होत्या. त्या वेळी शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर त्यांनी चांगलाच आवाज उठवला होता.दरम्यान, पावशे व घोलप यांचे महापौर देवळेकर, स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, गटनेते रमेश जाधव आदींनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)>पावशे यांचे पुर्नवसन : परिवहन समितीवर बिनविरोध निवड झालेले पावशे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. २०१५ ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते इच्छुक होते. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. अखेर, त्या बदल्यात पावशे यांना सभापतीपद बहाल केल्याचे बोलले जाते.
सभापतीपदी पावशे, घोलप
By admin | Published: April 06, 2017 3:52 AM