मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या आठ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती दिली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
२०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तर औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.