पवनानगर : पवना धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. बारा तासांत १०७ मिमी अशी या हंगामातील विक्रमी पावसाची नोंद झाली असून, धरण ८७ टक्के भरले आहे. धरणातून ३१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरणामध्ये २०९.३८ दशलक्ष घनमीटर (८.४८५ टी.एम.सी) एवढा पाणीसाठा झाला असून, या वर्षी एकूण १६६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी धरणात फक्त ६६ टक्के पाणीसाठा होता. १२०४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही पावसाचे दोन महिने बाकी असल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बारा तासांत धरण परिसरामध्ये १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामातील हा विक्रम आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत होते. गुरुवारी संध्याकाळी पवना धरण ८० टक्के भरले होते. परंतु शुक्रवार सकाळपासून जोरदार पावसामुळे दुपारी तीनपर्यंत धरणाच्या साठ्यात सात टक्क्यांनी वाढ झाली. जलसंपदा विभागाने दुपारी अडीचला नदीपात्रातून १२०० क्युसेक पाणी सोडले होते. पावसाचा जोर कायम राहिल्याने पुन्हा साडेतीनला ३१६० क्युसेक पाणी सोडण्यात आले.
पवना धरण ८७ टक्के
By admin | Published: August 06, 2016 1:04 AM