पिंपळे गुरव : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधून पवना व मुळा नदी वाहत असून, नदीपात्रात जलपर्णी वाढल्यामुळे नदीपात्राला हिरवेगार मैदानाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला साथीच्या रोगाचा धोका निर्माण होत आहे. येथील पवना नदीचे पात्र जलपर्णीने झाकोळले असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दशक्रिया घाटापासून पवना नदी व मुळा नदी संगमापर्यंत पात्र पूर्णपणे दाट जलपर्णीने आच्छादिले आहे. हिरवेगार मैदान तयार झाले आहे. त्यामध्ये डासांच्या वाढीबरोबर दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. सांगवी गावठाण, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, ममतानगर, पवारनगर, जयमालानगर, मुळानगर, प्रियदर्शनीनगर, साई मिनी मार्केट आदी भागांमध्ये डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री झापेच्या वेळी डास चावा काढतात. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. तसेच ठेकेदाराने जलपर्णी काढण्याचे कंत्राट घेऊन लाखो रुपये लाटल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाच्या आपापसांतील तू-तू, मै-मै वृत्तीमुळे जलपर्णीचा प्रश्न दर वर्षी उन्हाळ्यात उभा राहतो. त्यामुळे उन्हाच्या झळांबरोबर डासांच्या उपद्रवालाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने जलपर्णी काढण्याचे काम त्वरित करावे. प्रत्येक वर्षीच प्रशासनाकडून दिरंगाई केली जाते. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, अन्यथा नागरिकांसह आमचे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासह आम्ही आंदोलन करू , असा इशारा हर्षल ढोरे यांनी दिला आहे. जलपर्णीचा नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ही जलपर्णी काढावी अशी मागणी होत आहे.(वार्ताहर) वारंवार प्रशासनाला लेखी निवेदने देऊनही जाग येत नाही. नागरिकही वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे लेखी तक्रारी करतात. मात्र, महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे ओठही आपलेच आणि दातही आपलेच. त्यामुळे नागरिकांना न्याय कसा द्यायचा, हा एकच प्रश्न आहे.- हर्षल ढोरे, राष्ट्रवादी काँगे्रस विद्यार्थी संघटना, पुणे शहर जिल्हा. सध्या नदीपात्रात जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. नदीकाठच्या घरांजवळ रात्री धुरळणी सुरू केली आहे. लवकरच निविदा काढून नदीपात्रातील जलपर्णी काढली जाईल. नदी स्वच्छतेचे काम ठेकेदार वर्षभर पाहणार आहेत. - रवींद्र भोकरे, क प्रभाग सहायक आरोग्य अधिकारी
पवना नदीपात्र बनले हिरवेगार
By admin | Published: April 28, 2016 1:58 AM