मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्षातून झालेल्या आउंटगोईंगनंतर पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. मात्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष अजुनही सैरभैर असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही. तर राष्ट्रवादीची यात्रा बऱ्यापैकी चर्चेत आली. पण हे पुरसं नव्हतं.
दरम्यान राष्ट्रवादीची यात्रा सुरू असतानाच पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या सभांना प्रत्येक जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद देखील मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा बुस्टर डोस ठरणार आहे. त्याचवेळी काँग्रेसची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. तर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना अद्याप फारसचा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे काँग्रेस स्पर्धेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह निर्माण झाला असला तरी काँग्रेसमध्ये 'जैसे थे' स्थिती असल्याचे दिसून येते.