पवार-फडणवीसांच्या जुगलबंदीने गाजतोय कुस्तीचा आखाडा !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:55 AM2019-10-13T11:55:46+5:302019-10-13T11:56:47+5:30
विधानसभा निवडणुकीने यावेळी कुस्तीचा आखाडा व्यापून टाकला आहे. या कुस्तीच्या आखाड्यात कोणता मल्ल जिंकणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विविध मतदार संघातील निवडणूक प्रचाराला रंगल चढली आहे. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येतोय, तसा प्रचाराचा जोर वाढत असून आरोपप्रत्यारोपांची फेरी झडत आहेत. या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक विधानसभेची असली तरी पैलवान आणि कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजताना दिसत आहे.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला आहे. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी प्रचारसभा घेतली. याच सभेत पवारांनी सत्ताधारी भाजपला डिवचताना पैलवान नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभा का घेता असा सवालही उपस्थित केला होता.
पैलवान नसल्याचा धागा पकडून अमोल कोल्हे यांनी देखील फडणवीसांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून कोल्हे म्हणाले की, पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. तसेच तुमच्यासमोर पैलवान नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात का, आखाडा खणायला येतायेत का ? असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला.
एकूणच विधानसभा निवडणुकीने यावेळी कुस्तीचा आखाडा व्यापून टाकला आहे. या कुस्तीच्या आखाड्यात कोणता मल्ल जिंकणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.