आज सकाळी सकाळीच अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या घरी भेटीला गेले आणि राज्यात वेगवेगळी चर्चा सुरु झाली होती. परंतू, नंतर वळसे पाटलांनी शरद पवार ज्या संस्थांचे अध्यक्ष आहेत, त्यातील काही संस्थांशी संबंधीत चर्चेसाठी आपण शरद पवारांना भेटल्याचे स्पष्ट केले आणि चर्चांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यानंतर थोड्याच वेळाने अजित पवार आणि शरद पवार हे दिवाळीनिमित्त कुटुंबाच्या कार्यक्रमाला एकाच ठिकाणी आले आहेत.
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत. रक्षाबंधनाला अजित पवार कार्यक्रमाला आले नव्हते. यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का असा प्रश्न राज्यभरातील कार्यकर्त्यांना पडला होता. आज सकाळी १२ च्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे दोघे बाणेरला पोहोचले. त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे बाणेरला पोहोचले होते. यामुळे आता भाऊबीजेला अजित पवार येतात का, या प्रश्नावरही लवकरच उत्तर मिळणार आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे. अजित पवारांनी भर सभेत शरद पवारांच्या वयाचा प्रश्न काढला होता. तसेच शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केली होती. यामुळे सुरुवातीला शरद पवारांचीच फूस असल्याचे वाटत असलेले बंड आता आमदारकी-खासदारकीच्या अपात्रतेपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सुप्रिया सुळेंच्या खासदारकीविरोधात अजित पवार गटाने अपिल केले आहे.
अजित पवारांना गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू झाला होता. यामुळे ते राजकारणातून काहीसे सुट्टीवर गेले होते. कालही त्यांनी ट्विट करून आजारपणातून रिकव्हर होण्यासाठी डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे जाहीर केले होते. राजकीय दौऱ्यावर जात नसले तरी अजित पवार हे कुटुंबाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत.