मुंबई - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आधिवेशन नुकतेच पार पडले. राज यांनी पक्षाची भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. यापुढे हिंदुत्व घेऊन वाटचाल करणार असल्याचे राज यांनी जवळजवळ स्पष्ट केले आहे. याआधी ते मराठीच्या मुद्दावर राजकारण करत होते. आता ते मराठीसह हिंदुत्वाला सोबत घेणार आहेत. हे सगळ सुरू असताना राज ठाकरेंनी महामुलाखतीत शरद पवारांना विचारलेला प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती. एका नेत्याने दुसऱ्या दिग्गज नेत्यांची मुलाखत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. राज ठाकरे यांनी देखील शरद पवारांना बोलतं केलं होतं.
या मुलाखतीत राज ठाकरे यांनी रॅपीड फायर राऊंडमध्ये पवारांना एकच पर्याय निवडायचे सांगत तुम्हाला कोण हंव राज की उद्धव ? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळत शरद पवारांनी 'ठाकरे कुटुंब' अस उत्तर दिलं होतं. त्यावरून एकच हशा पिकला होता. मात्र राज यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा एकच आमदार विजयी झाला. तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन आघाडीचे सत्तेत पुनरागमन घडवून आणले. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास तयार केले. यामुळे शरद पवारांना कोणं हवं होतं या प्रश्नाचे उत्तर राज यांना मिळाले. मात्र त्यासाठी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.