मुंबई - गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले बदामराव पंडित यांचे बंड कायम आहे. शिवसेनेत दाखल झालेल्या बदामरावांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून ते आता अपक्ष मैदानात आहे. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे बदामराव यांना उमेदवारी मिळू शकली नसली तरी त्यांच्या बंडखोरीचा फटका युतीचे उमेदवार लक्ष्मण पवार यांना बसण्याची शक्यता आहे.
गेवराई मतदार संघातून 2014 मध्ये लक्ष्मण पवार यांनी 50 हजारहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे पवारांचे पारडं सध्याच्या घडीला जड दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून युवा नेतृत्वाला संधी देण्यात आले. विजयसिंह पंडित यांना उमेदवारी मिळाल्याने तरुणांमध्ये उत्साह आहे. अशा स्थितीत बदामराव पंडितांच्या अपक्ष उमेदवारीमुळे युतीच्या मतांमध्ये विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
लक्ष्मण पवार यांची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपला पोषक वातावरण असल्यामुळे ते काही प्रमाणात निश्चित असू शकतात. परंतु, विजयसिंह पंडित यांना हलक्यात घेणे त्यांना परवडणारे नाही. विजयसिंह यांची उमेदवारी खुद्द शरद पवार यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदार संघात त्यांची प्रतिमा उंचावली आहे. याचा लाभ त्यांना निवडणुकीत होऊ शकतो.
एकूणच भाजपचे लक्ष्मण पवार, अपक्ष बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या तगड्या उमेदवारांमुळे गेवराईची लढत तिरंगी होणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार पवार आपली जागा कायम राखतात की, पंडितांमधून कोणी बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.