पुणे: ‘मी कधी लोकांमधून निवडून आलेलो नाही असा आक्षेप घेणाऱ्या पवारांना माहिती नसेल, पण मी पाच जिल्ह्यांमधून निवडून येतो. त्यांनी तरी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला. पदवीधर मतदारसंघातील मतदार उलट जास्त विचारी व हुशार असतात असे ते म्हणाले.पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रदर्शित केले जात आहे यावर ते म्हणाले, ‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो. त्यामुळे ते तसे प्रदर्शित करत असतील तर त्यात काही गैर नाही.’’भाजपाचे सगळे काही स्वबळावर असल्यासारखे सारखे चालले आहे याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, ‘‘तसे काहीच नाही. आम्ही युतीचे म्हणूनच सगळे बोलत असतो. जागा वाटपाचा मुद्दा असेल तर ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या तशाच ठेवणे हे कोणत्याही युतीमधील सर्वसाधारण तत्व असते. तसेच ते आहे. एखाद्या जागेबद्दल देवाणघेवाण होऊ शकतो, मात्र तो विषय वरिष्ठ स्तरावर होतो, स्थानिक स्तरावर नाही. त्यासाठी राजकीय स्थिती लक्षात घेतली जाते. पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा भाजपाकडे आहे, मात्र त्यात काय होईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही काही देणार असून तर त्यांनाही काहीतरी द्यावे लागेल. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’’काँग्रेसमुक्त राज्य करायचे असे म्हणतो त्यावेळी काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्ट कारभार, बेशिस्त या संस्कृतीपासून राज्याला मुक्त करायचे असा त्याचा अर्थ असतो असे पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात घेऊन का असे विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘भाजपात घेताना तावूनसुलाखून घेतले जाते. आम्ही विखे यांना पक्षात घेतले, भूजबळांना घेतलेले नाही. विखे यांच्यावर कसलेही आरोप नाहीत. एकूण आमदार किंवा मंत्री यामध्ये भाजपाचे प्रमाणच जास्त आहे. गेल्या ५ वर्षात बाहेरून घेतलेल्या फक्त विखे यांना मंत्री केले आहे. भाजपाचा मुळ विचार राष्ट्रीय विचार आहे. हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार आहे.’’
..पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:51 AM
‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो.
ठळक मुद्दे मी पाच जिल्ह्यातून लढतो हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार