शरद पवार यांच्या मनाचा अंदाज बांधणे तसे सहजासहजी कुणालाही शक्य होत नाही. त्यांच्या प्रत्येक कृती, वक्तव्यात कायमच सस्पेन्स आणि काढू तितके अर्थ दडलेले असतात. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे केंद्रबिंदू ठरलेल्या साहेबांनी ' किंगमेकर' म्हणूनही स्वतःचा तितकाच दबदबा निर्माण केला आहे. पण काल मुंबईत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची गोळाबेरीज केली तरी शंभरी पार होत नाही. नाहीतर आम्ही देखील सरकार स्थापन केले असते, असे वक्तव्य केले. जनतेने आम्हाला सक्षम विरोधीपक्षाची भूमिका पार पडण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात आम्हाला कोणताही रस नाही. तसेच जनतेने महायुतीला सरकार स्थापनेचा कौल आहे. पवार साहेबांच्या या वक्तव्याने राजकीय पटलावरील अनेकांच्या सत्तेच्या गोळा बेरजेला मुरड घातली हे वेगळे सांगायला नको.. आणि तिथेच साहेबांच्या मनातला मुख्यमंत्री कोण याचा अंदाज बांधणे काही प्रमाणात का होईना शक्य झाले. पुन्हा एकदा '' देवेंद्र फडणवीस'' यांनीच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी असे तर त्यांच्या मनात नसेल ना.. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही शिवसेनेची भूमिका आजच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. पण त्यावेळी साहेबांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर करत शिवसेनेच्या नाराजी नाट्यातील हवाच काढून टाकली. त्यानंतर डोळे पुसून रडत कढत सेनेला भाजपासोबत अख्खा पाच वर्ष संसार थाटावा लागला होता. तसेच जे काही पदरात पडले ते गोडं मानून घ्यावे लागले होते. पण ही धुसफूस अगदी २०१९ साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर देखील कायम होती. त्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरें यांच्याशी बंद दरवाजाआड जी काही चर्चा केली तिथून मग पुन्हा एकदा काही झालंच नव्हतं या आविर्भावात तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा म्हणत महायुतीचं बिगुल वाजवलं गेलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही युती कायम राहिली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने स्वतः १५० जागा लढवत सेनेला १२४ जागा दिल्या. पुणे शहरात तर एकही जागा दिली नाही.त्यामुळे आधी पाच वर्षात झालेल्या आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मानहानीकारक अपमानांची आग शिवसेनेच्या गोटात चांगलीच धगधगत होती. मात्र, नियतीने निवडणुक निकालानंतर शिवसेनेला चुन चुनके बदला घेण्याची नामी संधी मिळवून देत सत्ता स्थापनेत भाजपवर गुरगुरण्याची, रडकुंडीला आणण्याची चांगली संधी दिली.
त्यात या महाभारतात सेनेने सत्ता स्थापनेची सूत्रे दिली ती संजय राऊत नावाच्या धुरंधराकडे.. त्यांनी मग आपले सगळे डावपेच संपादकीय कौशल्य पणाला लावत कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत भाजपावर एकापेक्षा एक तीक्ष्ण वाक्यांचे शरसंधान करत घायाळ केले आहे. एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी ठाम भूमिका घेत त्यांनी भाजपाला जेरीस आणले आहे असताना पवार साहेबांनी काल शिवसेनेची कोंडी करणारी ' गुगली' टाकली. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांनी अगदी कालपर्यंत घेतलेली भूमिका ही शिवसेनेला गोंजारणारी किंवा दिलासादायक होती असेच प्रथमदर्शनी सर्वाना वाटत होते. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी देखील पवारांच्या प्रत्येक भेटीचा इव्हेंट आणि शिवसेनेच्या मार्केटिंगसाठी जास्तीत जास्त कसे होईल याचीच काळजी घेत होते. मात्र, पवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्ष सत्ता स्थापन करणार नसून विरोधीपक्षात बसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
पवार साहेबांच्या मनात सध्या तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री नको अशीच भूमिका असा अंदाज वाटतो. कारण भाजपाकडे असणाऱ्या सर्वाधिक जागा आणि राज्यातील यापुढील काळातील गंभीर परिस्थिती पाहता इथे सक्षम निर्णय घेणारा आणि निदान काही वर्षांचा अनुभवी मुख्यमंत्री असावा अशी त्यांच्या मनाची धारणा कदाचित असू शकते. पवार साहेब हे पक्के राजकारणी जरी असले तरी ते एक परिपक्व नेते आहे. ते राजकारणा बरोबरच सामाजिक भानही वेळोवेळी दाखवले आहे. किंबहुना कालही त्यांनी अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याचा दिलेला सल्ला माध्यमे आणि भाजपा- शिवसेनेला सत्ता स्थापनेचा संघर्ष टाळत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्याच्या परिस्थितीला तरी फडणवीस यांच्याखेरीज दुसरा सक्षम पर्याय महायुतीत अस्तित्वात नाहीत. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदींशी असलेली त्यांची जवळीक पाहता शरद पवार साहेबांच्या मनातला मुख्यमंत्री कदाचित देवेंद्र फडणवीस असावेत.?