मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीदरम्यान संसदेचे ऐन गणेशोत्सवात असलेले अधिवेशन, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.
‘इंडिया’च्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत दिल्लीला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीवेळी राऊत हेही उपस्थित होते. ते म्हणाले, आजच्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. कारण हा दोन पक्षांचा विषय नसून तो आघाडीचा विषय आहे. संसदेचे विशेष अधिवेशन हे महाराष्ट्र तोडण्यासाठीच असल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडली आहे. त्यावरही चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. काँग्रेस नेते जनसंवाद यात्रेत असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून उद्या होणाऱ्या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रतिनिधी दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.