पवारांच लक्ष आता विदर्भावर ? अधिवेशन काळात नागपुरात दोन दिवस मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 03:42 PM2019-12-16T15:42:00+5:302019-12-16T15:42:35+5:30
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला तळागाळात पोहचविण्यासंदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात विदर्भात राष्ट्रवादी सक्रिय झाल्यास, नवल वाटायला नको.
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात सर्वात पुढं असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता राज्यातील इतरही भागावर पकड निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खुद्द शरद पवार यासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. विदर्भात राष्ट्रवादीचे संघटन फारसे मजबूत नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
आजपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हजेरी लावणार आहे. पवार नागपूरमध्ये दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत.
या कालावधीत ते विदर्भातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे विदर्भात भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न तर पवार करत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु, 2014 पासून याला भाजपने छेद दिला आहे. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा कमबॅकचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला तळागाळात पोहचविण्यासंदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात विदर्भात राष्ट्रवादी सक्रिय झाल्यास, नवल वाटायला नको.