मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबाबत आपली भूमिका व्यक्त केली. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वादात आता देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. 'शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य आहे', असे फडणवीस म्हणाले.
'ज्यांना काँग्रेसनं जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच त्यावर डाका मारला'
आज देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच, शरद पवार यांनी काँग्रेसवर व्यक्तं केलेलं मत योग्य असल्याचं म्हटलं. 'मला वाटतं की, शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. सध्या काँग्रेस आपल्या जुन्या पुण्याईवर जगतोय. मालगुजारी तर गेली, आता उरलेल्या मालावर गुजरान चालली आहे. शरद पवारांनी केलेलं वर्णन चपखल लागू होणारं आहे', अशी टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केली.
काय म्हणाले होते शरद पवार ?एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय. असं असलं तरी काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत, असं पवार म्हणाले होते.