मुंबई - पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते सोडून गेल्याने गलीगात्र झाला. त्यात जे नेते पक्षात आहेत, त्यांना चौकशीची भीती वाटत असून असे नेते सरकारविरुद्ध बोलणे टाळत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीच मैदानात उतरणे पसंत केले असून वयाच्या ७९व्या वर्षी त्यांची सोलापूरमध्ये दिसलेली जिद्द सत्ताधारी पक्षाच्या महाजनादेशच्या मत्त्वकांक्षेला आव्हान देणारी आहे.
२०१४ पासून राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांना पलायन केले आहे. यामध्ये बहुतांशी नेते विद्यमान आमदार होते. या नेत्यांना आपल्यात सामावून घेतल्याने राष्ट्रवादी खिळखीळी करण्याची योजना सत्ताधारी भाजपची होती. अर्थात यामध्ये त्यांना यशही आले. राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने नुकतीच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेत कोल्हेंच्या साथीला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. परंतु, अजित पवार यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्याने ते शिवस्वराज्य यात्रासोबत पूर्णवेळ राहु शकले नाही. या यात्रेत शरद पवार नव्हते. परंतु, आता पवारांनी स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निश्चय केला असून सोलापुरातून त्याची सुरुवात केली आहे.
मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. मी घरच्यांना सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा; मला आता काही लोकांकडे बघायचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी गयारामांना गर्भित इशारा दिला. त्यांचा हा इशारा केवळ गयारामांना नसून सत्ताधारी भाजप-शिवसेनेला देखील आहे. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर देखील कडाडून टीका केली. ज्यांनी कष्ट घेतले त्यांनी या जिल्ह्याचा इतिहास बदलला. आज या इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्यांच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आहे, असा टोला पवारांनी मोहिते-पाटील यांचा नामोल्लेख न करता लगावला.