मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या संभाव्य भूमिकेचे विश्लेषण करण्यात चांगले चांगले विश्लेषक गारद झाले आहेत. तर 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल' असं त्वेषाने सांगणारे माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पवारांच्या चालींसमोर निष्प्रभ झाले आहे. त्याच पवारांची भीती आता, मित्रपक्ष होऊ पाहात असलेल्या शिवसेना आमदारांना वाटायला लागली आहे.
राजकारणात घट्ट मैत्री किंवा कट्टर शत्रुत्व असं काही नसतं, हे नेहमीच दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही त्याची प्रचिती येत आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सरकार स्थापन्याची शक्यता आहे. मात्र पवारांनी महाशिवआघाडीविषयी केलेलं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं केलेलं कौतुक यामुळे शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.
शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे.
दरम्यान पवारांविषयी काहीही निश्चित ठरवणे कठिण आहे. ते कोणत्याही क्षणी आपला स्टँड बदलू शकतात. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पवारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पुढील वाटचाल करावी, असं मत शिवसेना आमदारांच आहे. एकूणच पवारांच्या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ज्याप्रमाणे अस्वस्थता आहे. त्याप्रमाणे मित्रपक्ष होऊ पाहात असलेल्या शिवसेना आमदारांनाही काळजी वाटत आहे.