राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्यासंदर्भात घोषणा केली आहे. याचा केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर महाविकास आघाडी आणि देशाच्या राजकारणावरही परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. यातच आता, "केंद्रीय पातळीवर जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजप विरोधात आघाडी उभी करत आहे. अशावेळी पवारांची निवृत्ती ही न पटनारी गोष्ट आहे. त्यांनी असे करायला नको अशीच भावना आहे," असे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण म्हणाले, "पवारांसारख्या अनुभवी नेत्याने अशा प्रकारे अचानक राजीनामा देणे ही निश्चितपणे खटकणारी गोष्ट आहे. विशेषतः केंद्रीय पातळीवर जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजप विरोधात आघाडी उभी करत आहे. अशावेळी पवारांची निवृत्ती ही न पटनारी गोष्ट आहे. त्यांनी असे करायला नको अशीच भावना आहे. पण त्यांचा हा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेस पक्ष या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
महाविकास आघाडीवर परिणाम होईल? - पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, नेतृत्व बदलत राहते. पण एक अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर, मला वाटते महाविकास आघाडीचे नुकसान होईल. यामुळे त्यांचे राहणे गरजेचे आहे, असे मला वाटते. पण हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांची जी समिती गठित झाली आहे त्यांना घ्यावा लागणार आहे. मला वाटते समितीने या संपूर्ण गोष्टींचा विचार करून पवार साहेबांना त्यांच्या विचारावर फेरविचार करण्यासाठी भाग पाडावे, अशी आमची सर्वांची विनंती राहील.