सोलापूर : अनुभवी प्रशासनाची माहिती असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससारख्या भक्कम विरोधी पक्षाची लोकशाही राज्याला खरी गरज आहे. यापुढेही सतत दहा वर्षे असा अनुभवी, जागरूक विरोधी पक्षच लोकशाहीला मजबूत करेल, अशी मतदारांची अपेक्षा आहे. अर्थात १९७८ पासून शरद पवारांची सरासरी ५० आमदारांचीच स्ट्रेंथ आहे. त्या ५० मध्ये देखील १५ आमदार राजकारणातले संस्थानिक असून, वडिलार्जित सात-बारा समजूनच सातत्याने निवडून येतात. अर्थात विधानसभेच्या आठ निवडणुका जर पाहिल्या तर पवारांची स्ट्रेंथ ५० आमदारांचीच असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकान्वये केला आहे.
मुरब्बी अन् शेवाळलेल्या नेतृत्वाच्या हाती विरोधी बाकावर बसण्याची जबाबदारी मतदारांनी टाकली असून, लोकशाही अधिक समृद्ध झाल्याचेच लक्षण आहे़ कारण गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्ष अतिशय कमकुवत होता़ मुद्यांऐवजी गुद्यांवर येण्यासाठी धडपडत होता, विचारापेक्षा गोंधळाकडे त्याचा कल असायचा़ परंतु आज सर्वच पक्षांकडे अभ्यासू आमदारांची संख्या जोरदार असून, उद्धव ठाकरेंनी बारामतीला जुळवून घेतले तर १९७८ पासून २०१९ पर्यंत ५० आमदारांचे अॅव्हरेज असलेला पक्ष शरद पवारांनी मोठ्या कष्टाने सांभाळला आहे, असे ते म्हणाले.
तामिळनाडूच्या जयललिता, आंध्रचे चंद्राबाबू तर बंगालच्या ममता दीदी असो स्वत:च्या कष्टावर त्यांनी राज्य आणले. परंतु धरणीमातेच्या सेवेसाठी राज्य राखण्यापेक्षा राज्य अडचणीत आणण्याचा कार्यक्रम पवारांनी मोठ्या खुबीने राबवला आहे़ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यातले नेते सन्मानासाठी गर्दी करणारे असून, भाजपने राष्ट्रवादीच्या सन्मानासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करून पवारांचा सन्मानच केला आहे़ ईडीची चौकशी झाली आणि राष्ट्रवादीला १५ आमदारांचे बळ मिळाले. राष्ट्रवादी आमदाराच्या काही माफक अपेक्षा आहेत़ सत्ता सांभाळणारे साखर कारखाने, त्यांचा साखर संघ, अनेक संस्थांचे फेडरेशन, राजकारणाला आर्थिक ऊर्जा देणारी शिखर बँक, या शक्तिस्थळांना धक्का लागल्यामुळे डिवचलेले शरद पवार अधिक बिथरले आणि आदळआपट करीत राहिले़ अर्थात पवार परिवाराला सन्मान देऊन विधानसभेत नुसता इशारा केला तरी महत्त्वाच्या वेळेला सभात्याग होत राहील आणि सत्ताधाºयांकडून इशारा करताच आमदार सभात्याग करत राहतील.
ईडीच्या नोटिसीने राष्ट्रवादीचे अधिक १५ आमदार निवडून आले. महाराष्ट्रातील मराठी तरुण बिथरले. आणखी एक-दोन पावसात पवार भिजून बोलले असते तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढली असती. जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलाय, असं सांगत राहतात तर दुसºया बाजूला बारामतीचा गूळ दाखवून संघर्षाचे राजकारण करतात़ सोशल मीडियामुळे आज कोणता पुढारी कसा वागतो, जातवार झालेल्या संघटनांना कोण कोणाला बळ देतो हे एका सेकंदात कळते. परंतु पहिल्याच निवडणुकीत सर्व समाज घटकाला न्याय देताना निवडणुका विकासकामावर झाल्या. लोकांनी सर्वांचे ऐकले आणि मतदान केंद्रात सात्विकपणाचे राजकारण केले. त्यामुळेच सर्वच पक्षांना भाजपच्या व्हिजनची आणि विकासकामाची भीती वाटते. कारण भारतीय जनता पक्षाकडे व्हिजन टँक आहे. प्रधान कार्यालयात देशाच्या विकासाचा प्लॅन आहे. पुढच्या पन्नास वर्षात काय करायचे ते आधीच ठरलेले आहे. त्यामुळे शंभर वर्षांची परंपरा लाभलेला, अडीचशे देशांमध्ये कामाने स्वत:ची ओळख सांगणारा, कष्टावर, त्यागावर आणि राष्ट्राच्या अस्मितेवर पक्षाची व्यप्ती वाढवणारा भारतीय जनता पक्ष आहे. यासाठीच प्लॅन राज्याचा, जिल्ह्याचा, अगर गावाचा असो प्रत्येक भागाच्या विकासाचा प्लॅन आहे, म्हणून त्यांची संगत करण्यापेक्षा काम करणाºया पक्षांशी मैत्री करणे आणि निर्मळ पक्षाच्या सावलीत राहून देशाची सेवा करणे यातच सौख्य सामावले आहे़
शिवसेनेला संपविण्याचा डाव..- राऊत पवारांची जोडीच देशाचं भलं करू शकते, असे अजूनही मतदारांना वाटते. कारण २०१४ साली सत्तेचे परिवर्तन झाल्यानेच प्रफुल्लभाई पटेल यांनी एकतर्फी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या शिडीतली हवाच काढून घेतली. मोठ्या हुशारीने आणि अवजड मंत्र्याचा राजीनामा घेऊन शिवसेना केंद्रातूनही मोकळी झाली आहे. अर्थात शिवसेना बारीक झाल्याशिवाय राष्ट्रवादी मोठी होत नाही, हे महाराष्ट्राचे खरे गणित आहे. एकेकाळी भुजबळ यांना हाताशी धरून शिवसेनेत उभी फूट पडली होती. तेव्हा शिवसेना तू बोलली होती, असेही ढोबळे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.