पवारांचे 'ते' तीन वक्तव्य, ज्यामुळे महाशिवआघाडीचे भवितव्य आले धोक्यात !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:44 PM2019-11-20T12:44:50+5:302019-11-20T12:46:10+5:30
महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती.
मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आगळीवेगळी महाशिवआघाडी अस्तित्वात येणार या चर्चेने महाराष्ट्राचे राजकारण ढवलून निघाले आहे. समसमान वाटपाच्या मुद्दावर शिवसेनेने भाजपला जय महाराष्ट्र केल्यामुळे विरोधी पक्षांच जनमत मिळालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेत बसण्याची आस लागली आहे. त्याचवेळी पवारांनी केलेल्या तीन वक्तव्यांमुळे महाशिवआघाडीचं भवितव्य अंधकारमय दिसत आहे.
शरद पवार यांनी 6 नोव्हेंबर रोजी म्हटले होते की, सत्तास्थापनेचा कौल भाजप आणि शिवसेनेला मिळाला आहे. त्यांनीच राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पवारांनी आम्ही जबाबदार विरोधीपक्ष बनू असं स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महाशिवआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती. परंतु, 18 नोव्हेंबर रोजी पवार म्हणाले की, आम्ही निवडणूक शिवसेना-भाजपसोबत लढवली नव्हती. त्यामुळे सरकार स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.