अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:31 PM2023-03-08T12:31:01+5:302023-03-08T12:31:47+5:30
शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मुंबई - राज्यात गेल्या २ दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
तसेच शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत, अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे, मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.