मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात ऑगस्ट, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, एसटी अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत, तर काही हजर राहूनसुद्धा एसटी बंद असल्याने कर्तव्य बजावू शकले नाही. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष पगारी रजा महामंडळाने मंजूर केली आहे.पूरस्थिती झालेल्या भागात एसटी कर्मचाºयांचे प्रचंड हाल झाले. एसटी बंद असल्याने आगारात येऊनसुद्धा कर्तव्य बजावता आले नाही. पूरस्थितीमध्ये कर्मचाºयांना घरी राहावे लागल्याने रजा घ्यावी लागली. त्यांना विशेष रजा मंजूर करण्याचा निर्णय चांगला असून, या निर्णयामुळे पूरग्रस्त कर्मचाºयांना न्याय मिळाला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.यापूर्वी ३० सप्टेंबर, १९९३ रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या भूकंपामुळे, २६/२७ जुलै, २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्मचाºयांना विशेष रजा देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कर्मचारी आणि अधिकाºयांना विशेष रजा देण्यात आली.
पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पगारी रजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:53 AM