राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये लवकरच मिळतील. याची आम्ही नव्या अर्थसंकल्पात तरतूद करू, असे विधान केले होते. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
शुक्रवारी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील नव्या सरकारने आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून २१०० रुपये महिना द्यावा. तसेच, महाराष्ट्र राज्याचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला देऊ नये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करावी, असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. याशिवाय, विधानसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला १०० टक्के मान्य नाही. आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे गेलो आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांना एका बुथवर केवळ एक मत मिळाले आहे, हे अशक्य आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतली. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तब्बल दोन आठवड्यांनी शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमची अपेक्षा आहे की, त्यांनी लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये प्रति महिना द्यावे. आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्याची भूमिका ठेवू, पण व्यक्ती हितासाठी सहकार्य करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कापूस, सोयाबीनला या सरकारच्या काळात भाव नसल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.