बहुरंगी लढती : मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यतानागपूर : गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणुका लढवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रत्येक प्रमुख उमेदवार त्याचे मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याने, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, मनसे, बसपा यांच्यासह छोट्या-मोठ्या पक्षाचे एकूण २११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीत त्यांचे भाग्य आजमावीत आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ही ३७ लाखांवर आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदार हा जास्तीतजास्त मतदार बाहेर काढण्यावर भर देणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली तर यावेळी मतदानाची टक्केवारी गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ब्रॅन्ड अॅम्बेसडर नियुक्त करून शाळा-महाविद्यालयांत मतदार जागृती अभियान राबविले आहे.उमेदवारांची संख्या अधिक असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे विशेष असणार नाही. त्यामुळे जो उमेदवार जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यास यशस्वी होईल त्याला जिंकण्याची संधी आहे. राजकीय पक्षानेही त्यांच्या अधिकाधिक जागा जिंकून याव्या यासाठी यंत्रणा तयार केली असून, त्याचाही मुख्य आधार हा मतदारांना घराबाहेर काढण्यावरच असणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मतदानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.२००९ च्या निवडणुकीत काटोल (६४.८९ टक्के), सावनेर ( ७०.१९ टक्के) हिंगणा (५८.१३ टक्के), उमरेड (६२.६८ टक्के), कामठी (५८.८२ टक्के), रामटेक (६४.७६ टक्के), दक्षिण-पश्चिम (४९.८० टक्के), दक्षिण नागपूर (४७.५८ टक्के), पूर्व नागपूर (५६.६० टक्के), मध्य नागपूर (५०.७६ टक्के), पश्चिम नागपूर (४६.९६ टक्के), उत्तर नागपूर (४८.०२ टक्के).(प्रतिनिधी)विनापरवानगी एसएमएस फोन करणाऱ्यांना नोटीसप्रचार थांबल्यावर एसएमएस किंवा फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास मनाई आहे. मात्र तरीही विनापरवानगी उमेदवारांचे प्रचारासाठी एसएमएस आणि फोन येत आहेत. याकडे सोमवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांचे लक्ष वेधले. विनापरवानगीने एसएमएस किंवा फोन करणाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय निवडणूक शाखेने घेतला आहे.
शांतता, प्रचार संपला!
By admin | Published: October 14, 2014 1:02 AM