मनोहर कुंभेजकर,मुंबई- गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला आणि फलाटाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करून, अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, चर्चगेटच्या दिशेने असलेला सदर पादचारी पूल छपराविना आहे. त्यामुळे सध्याच्या रखरखत्या ऊन्हात हजारो प्रवाशांना ऊन्हाच्या झळा बसत आहे.दररोज हजारो प्रवासी आणि पादचारी येथील पुलाचा वापर करतात. सध्याच्या ऐन उन्हाळ्यात पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना ऊन्हाचे चटके सहन करत, रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. या प्रकरणी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही बाब संबंधित रेल्वे अधिकाऱ्याकडे दाखल करत, पादचारी पुलावर छप्पर बसवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या पादचारी पुलावरून पादचारी आणि प्रवासी भर ऊन्हातून जाताना, त्यांना ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच हा पादचारी पुलाचा तळ पत्र्याचा असल्यामुळे, त्यांना कडकडत्या ऊन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गोरेगावकर त्रस्त झाले आहेत. या पादचारी पुलावरून दररोज हजारो प्रवासी ये—जा करत असतानाही रेल्वे प्रशासन पुलावर छप्पर का बसवत नाही? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.सदर पादचारी पूल हा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या अख्यारित येत आहे. त्यांनीच या पुलाची दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे या पुलावर कधी छप्पर बसविण्यात येईल, यांचे रेल्वे प्रशासनाकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडे बोट दाखविले आहे. मात्र, याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
पादचारी पूल छपराविना
By admin | Published: April 05, 2017 2:38 AM