लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : धावपट्टी उभारणीसाठी ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून गुरुवारी १७ गावांतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, तर या हिंसक जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गनमधून गोळीबार केला. यात पोलिसांसह २६ जण जखमी झाले. मात्र ही जमीन आपल्याच मालिकीची असल्याचा दावा संरक्षण विभागाने केला आहे.दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांनी घेतलेल्या १७ गावांतील या शेतजमिनींचा ताबा सध्या नौदलाकडे आहे. त्यांनी भिंत बांधण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांना आत जाण्यास मज्जाव केल्याविरोधात जमीन बचाव आंदोलन समितीने काटई नाका-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी नाक्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. नौदल उभारत असलेल्या संरक्षक भिंतीला काही शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शेतात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. तेव्हा चारही बाजूंनी आलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने नेवाळी नाक्यावरील पोलिसांची व्हॅन जाळली. तसेच अंबरनाथच्या दिशेने व खोणीच्या दिशेने रस्त्यावर टायर जाळले आणि १५ खासगी तर पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस; तर गोळीबारात १४ शेतकरी जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण शांतता आहे. मात्र जमिनी ताब्यात मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने पोलीस बंदोबस्त कायम आहे.
जमिनी परत मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पेलेट गनचा मारा; १४ जण जखमी
By admin | Published: June 23, 2017 3:10 AM