ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - महाराष्ट्र सरकार डान्सबारना परवानगी देण्यासाठी नव्याने तयार करत असलेल्या कायद्यामध्ये अनेक कठोर तरतुदींचा समावेश केला आहे. फ्लोअरवर नाचणा-या बार डान्सर्सना स्पर्श केला किंवा त्यांच्यावर पैसे उधळले तर, सहा महिने तुरुंगवास किंवा ५० हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे.
नव्या कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सर्वपक्षीय २५ आमदारांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारचा डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली.
मंगळवारी विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही नियमांबद्दल चर्चा झाली. या नियमांचे विधेयकामध्ये रुपांतर करुन अंतिम मंजूरीसाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक पटलावर मांडले जाईल. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल आणि संपूर्ण राज्यात हा कायदा लागू होईल असे अधिका-याने सांगितले.
डान्सबारच्या प्रवेशव्दारावर आणि डान्स फ्लोअरवर सीसीटीव्ही बंधनकारक असेल. नव्या कायद्याच्या मसुद्यामध्ये बार मालकाने बार डान्सरला आपला उपयोग करण्याची परवानगी दिली तर, १० लाख रुपये दंड व तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.