मुंबई: नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन अभिनेत्यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या कामाची मुंबई उच्च न्यायालयाने प्रशंसा केली असून एका प्रकरणात पक्षकाराला केलेल्या दंडाची दीड लाख रुपयांची रक्कम या फाउंडेशनला अदा करण्याचा आदेश दिला आहे.आशुतोश गोवारीकर यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेला ‘मोहेंजो दारो’ हा हिंदी चित्रपट येत्या १२ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे कथानक आपण १९९५ मध्ये लिहिलेल्या त्याच नावाच्या कथेवरून चोरले असल्याचा आरोप करत याचा निर्णय होईपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनास अंतरिम मनाई करावी, असा अर्ज आकाशादित्य हरिश्चंद्र लामा यांनी त्यांच्या प्रलंबित दिवाणी दाव्यात केला होता. न्या. गौतम पटेल यांनी हा अर्ज फेटाळला व लामा यांना खोटेपणाबद्दल अद्दल घडविण्यासाठी दीड लाख रुपये दंड केला.दंडाची ही रक्कम व्यक्तिश: आपल्याला न देता एखाद्या लोककल्याणकारी कामाला द्यावी, अशी विनंती गोवारीकर यांच्यातर्फे त्यांच्या वकिलाने केली. ती न्यायालयाने मान्य केली. हे प्रकरण चित्रपट उद्योगाशी संबंधीत आहे. त्यामुळे दंडाची रक्कम नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशनला देण्यात यावी, असा आदेश न्या. पटेल यांनी दिला. लामा यांनी ही रक्कम चार आठवड्यांत फाउंडेशनला अदा करायची आहे.लामा यांनी आपल्या या आरोपास अधी प्रसिद्धी माध्यमांत प्रसिद्धी दिली व आता हा दावा दाखल करून गोवारीकर यांच्यासारख्या प्रख्यात दिग्दर्शकाला ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या मोहिमेसाठी न्यायालयाचा वापर केला, असे नमूद करून न्या. पटेल यांनी या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तोंडावर असे ‘कॉपीराइट’ उल्लंघनाचे दावे दाखल करून न्यायालयाकडून त्याचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यांना कठोरपणे आळा घालायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले. (विशेष प्रतिनिधी)>हस्तलिखित कथा कुलूपबंदलामा यांनी आपल्या ज्या कथेवरून मोहेंजो दारा चित्रपटाचे कथानक चोरल्याचा आरोप केला आहे ती कुठेही प्रसिद्ध झालेली नाही किंवा स्क्रीन रायटर्स असोसिएशनकडे ती नोंदलेलीही नाही. न्यायालयात त्यांनी आपली हस्तलिखित कथा सादर केली. दाव्यात दाखल करण्यासाठी लामा यांनी हे हस्तलिखित बनावटपणे तयार केले आहे, असा गोवारीकर यांचा आरोप आहे. लामा यांच्या वकिलाने या कथेची प्लॅस्टिकच्या फोल्डरमध्ये घालून दिलेली हस्तलिखित प्रत न्यायालयाच्या प्रोथोनोटरीने स्वत:च्या ताब्यात सुरक्षित ठेवावी आणि न्यायालयाच्या आदेशाखेरीज ती कोणाच्याही हाती देऊ नये, असाही आदेश दिला.
दंडाची रक्कम दिली नाम फाउंडेशनला
By admin | Published: August 04, 2016 4:53 AM