मुंबई : सर्दी व तापाने आजारी पडलेल्या रुग्णांची चाचणी न करता भलतेच औषध देऊन रुग्णाची दृष्टी कमकुवत केल्याबद्दल व तिच्या अश्रूग्रंथी निकामी केल्याबद्दल राज्य तक्रार निवारण आयोगाने तिच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना व रुग्णालयाला चांगलाच दणका दिला. रुग्णाला २० लाखांची नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.दादरमधील शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या नीता देशपांडे (बदलेले नाव) यांना दिलेली गोळी घेतल्यानंतर त्याच दिवशी नीता यांना आणखी ताप भरला. अंगावर सुरकुत्या पडून अंगावर फोडही उठले. त्यामुळे नीता यांनी पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांच्या डॉक्टरांनी आपण काही दिवस बाहेर चाललो आहोत, असे सांगून दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार नीता यांनी संबंधित डॉक्टरांची भेट घेतली. ती गोळी घेतल्याने त्यांची अशी अवस्था झाल्याचे निदान संबंधित डॉक्टरांनी केले आणि तातडीने नीता यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. १५ सप्टेंबर २००७ ते २३ सप्टेंबर २००८ पर्यंत रुग्णालयात उपचार घेऊनही नीता यांच्या तब्येतीत काहीही फरक पडला नाही. उलट त्यांची दृष्टी कमी झाली, डोळ््याच्या पापण्या गळल्या आणि अश्रूग्रंथीही निकामी झाल्या. त्यानंतर नीता यांना सैफी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. फॅमिली डॉक्टर आणि सुश्रुषा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दृष्टी कमी झाल्याने व अन्य समस्या उदभवल्याने नीता यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नीता यांनी राज्य तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. डॉक्टरांनी व रुग्णालयाने आरोप नाकारत नीता यांच्यावर वैद्यकीय नियमांप्रमाणेच उपचार केले. सेवेत कोणतीही कसूर केली नसल्याचे आयोगाला सांगितले.वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे म्हणत आयोगाने तीन डॉक्टर व रुग्णालयाला प्रत्येकी पाच लाख रुपये असे २० लाख रुपये नीता यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. या रकमेवर नऊ टक्के व्याज देण्याचे आणि नीता यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी चौघांनी २५ हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले.
डॉक्टरांना २० लाख रुपयांचा दंड!
By admin | Published: September 26, 2015 3:10 AM